हैद्राबाद : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या प्राचार्य तथा संचालक रूपा रेड्डी यांच्या, राहत्या घरात झालेल्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच शाळेतील इयत्ता १०वीत शिकणार्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. हे विद्यार्थी त्यांच्या घरात चोरी करण्यासाठी शिरले होते. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी प्राचार्य रूपा रेड्डी यांच्यावर तब्बल २७ वेळा चाकूने वार करून त्यांची हत्या केली.
११ ऑगस्ट रोजी रूपा रेड्डी या त्यांच्या घरात एकट्या असताना त्यांची हत्या झाली. हत्येपूर्वी त्या त्यांच्या मावशीसोबत फोनवर बोलत होत्या. फोन कट होण्यापूर्वी त्यांनी बाबू असा उल्लेख केला होता. तेलगू भाषेत आणि अनेक वेळा शाळेतही विद्यार्थ्यांना प्रेमाने बाबू म्हटले जाते. या एका शब्दावरून सुगावा लावत पोलिसांनी तपासाची दिशा बदल, आपल्या तपासाचा रोख शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला...
अशी फिरली संशयाची सूई -
रूपा यांच्या हत्येनंतर १० वीच्या वर्गातील दोन विद्यार्थी अचानक मोठ्या प्रमाणावर पैशांची उधळपट्टी करू लागले. मित्रांसोबत पाटर्या करू लागले. नलगोंडाचे पोलीस अधीक्षक शरत चंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशय आल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर, एका विद्यार्थ्याकडून १.५१ लाख रुपये रोख आणि आयफोन जप्त करण्यात आला. महत्वाचे म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या नोटांवर मानवी रक्ताचे डाग आढळल्याने गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या मुलांना दारू पिण्याचीही सवय होती.
असा आखला होता कट
तपास अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येच्या सुमारे १५ दिवस आधी, यातील एक जण रूपा यांच्या नजरेत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक आणि शाळेतील काही कर्मचार्यांनी त्याला एका बॅगेत मोबाईल फोन आणि रोख रक्कम घेऊन जाताना पकडले होते. यानंतर, त्याला समजही देण्यात आली होती. मात्र यानंतर, रूपा यांनी त्याला वसतिगृहातून काढून केवळ नियमित वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता.
चाकूने केले तब्बल २७ वार
११ ऑगस्टला शाळेत फी जमा होत होती. यामुळे प्राचार्यांच्या घरात मोठा कॅश मिळू शकते, असा अंदाज बांधून या दोन विद्यार्थी मुलांनी ५ दिवस आधीच चोरीचा प्लॅन आखला. चोरी करताना प्राचार्य रूपा यांनी एका विद्यार्थ्याला बघितले. त्याने ओळख पटण्याच्या भीतीने चाकूने त्यांच्यावर तब्बल २७ वार करून त्यांची हत्या केली आणि २.५ लाख रुपये घेऊन पळ काढला. दरम्यान त्याचा एक सहकारी बाहेर उभा होता. दोन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. आता त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्याची प्रक्रिया सुरू आहे.